एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली : मुंबईहून दरे गावी पाठवले गेले डॉक्टर्स; केसरकरही न भेटताच परतले
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन 7 दिवस उलटले आहेत. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली असली तरी ते गृह मंत्रालयावर ठाम आहेत. 29 नोव्हेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिंदे मुंबईत परतले आणि सर्व कार्यक्रम रद्द करून साताऱ्याला त्यांच्या गावी रवाना झाले. आता त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करण्यासाठी साताऱ्याला गेले आहे.
एकनाथ शिंदेंना 105 ताप, घरातच करत आहेत आराम
यासंबंधीच्या वृत्तानुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 अंश सेल्सिअसचा ताप आला आहे. यामुळे ते आज दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना घरातच सलाईन लावली आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे महायुती सरकारचा प्रस्तावित शपथविधी सोहळा आणखी लांबतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दीपक केसरकर न भेटताच परतले
माजी मंत्री दीपक केसरकर हे आज एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी साताऱ्याच्या दरे या त्यांच्या गावी आले होते. पण शिंदेंची प्रकृती ठीक नसल्याचे कळताच त्यांना बंगल्याच्या गेटवरूनच आल्या पावली मुंबईच्या दिशेने माघारी फिरावे लागले.
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक लांबणीवर
दुसरीकडे, भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकही 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक आता 1 डिसेंबर ऐवजी 3 डिसेंबर रोजी होईल. याच दिवशी दिल्लीहून 2 पर्यवेक्षक येतील. आमदारांशी चर्चा केल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा करतील.
त्यातच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिव्य मराठीला सांगितले की, संघाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वा. मुंबईच्या आझाद मैदानावर होईल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत शपथ घेईल.
गृह आणि अर्थ मंत्रालयावर चर्चा अडकली
शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते होते. त्यांना हे मंत्रिपद सोडायचे नाही. आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळत असेल तर गृहखातेही मिळायला हवे, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे. शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघू शकला नाही.
यापूर्वी गृहखाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे फडणवीस कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाहीत. या वादामुळे शहा यांच्या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेवर कोणताही तोडगा निघू शकला नसल्याचे मानले जात आहे. गृहमंत्रीपद भाजप कधीही जाऊ देणार नाही, असेही जाणकारांचे मत आहे.
शिवसेना म्हणाली- शिंदे आज संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेतील
दरम्यान, शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले की- शिंदे यांना कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते त्यांच्या मूळ गावी जातात. आज संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील. शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील असे मला वाटत नाही, असे शिरसाट यांनी यापूर्वी म्हटले होते.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला एवढा मोठा विजय मिळाला, त्यामुळे बिहारच्या धर्तीवर तेच मुख्यमंत्री व्हावेत, असे शिवसेनेच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये जेडीयूच्या जागा कमी असूनही मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. त्याचवेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.
शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले...
मोदी-शहांच्या आदेशानंतरही निकालाच्या 8 दिवसानंतरही नव्या सरकारबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, ही भाजपची काय मजबुरी आहे? 132 आमदारांसह भाजप बहुमताच्या जवळ आहे. महायुतीकडे 200 च्या वर बहुमत आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री गावी जाऊन बसले आहेत. कोण होणार नवा मुख्यमंत्री? सरकार शपथ कधी घेणार? कोणालाच माहिती नाही.
महाराष्ट्राच्या निकालानंतर 7 दिवस उलटले, नव्या सरकारवर सस्पेन्स, 5 मुद्दे...
23 नोव्हेंबर : महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. महायुतीने 230 जागा जिंकल्या. भाजपने 132, शिवसेना (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) 41 जागा जिंकल्या. शिंदे म्हणाले होते - मुख्यमंत्रीपदाचा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील. 'एक है तो सेफ है', असे फडणवीस यांनी म्हटले होते.
25 नोव्हेंबर: 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला. महायुती पक्षांमध्ये प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपदाचा फॉर्म्युला समोर आला. त्यानुसार भाजपचे 22-24, शिंदे गटाचे 10-12 आणि अजित गटाचे 8-10 आमदार मंत्री होऊ शकतात.
27 नोव्हेंबर : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री मान्य आहे. मला पदाची इच्छा नाही. मी मुख्यमंत्री असताना मोदीजी माझ्या पाठीशी उभे होते. आता ते जो निर्णय घेईल तो मान्य केला जाईल.
28 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत सुमारे अडीच तास चर्चा केली. शिंदे यांनी अर्धा तास एकट्याने शहा यांची भेट घेतली. हायकमांडने शिंदे यांना केंद्रात उपमुख्यमंत्री किंवा मंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
29 नोव्हेंबर : महायुतीची (भाजप + शिवसेना शिंदे गट + राष्ट्रवादी अजित पवार) बैठक पुढे ढकलण्यात आली. एकनाथ शिंदे अचानक साताऱ्याला गेले. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृह आणि अर्थ मंत्रालयाची मागणी करत आहे. शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले- शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर पक्षातील दुसरा चेहरा हे पद स्वीकारेल.
About The Author
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book. It has survived not only five centuries, but also the leap into electronic typesetting, remaining essentially unchanged. It was popularised in the 1960s with the release of Letraset sheets containing Lorem Ipsum passages, and more recently with desktop publishing software like Aldus PageMaker including versions of Lorem Ipsum.
Comment List